भाजपचे माजी नगरसेवक पालिका कार्यालयात बसणार असतील तर…

महाराष्ट्र

मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक जर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसणार असतील तर इतर पक्षांची पक्ष कार्यालये देखील खुली करण्यात यावीत, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी केली आहे.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावर आक्षेप नोंदवत पालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत कोणतीही तरतुद नसल्याचे सांगितले.

शेख म्हणाले, पालकमंत्री महानगरपालिकेत जाऊन आपलं कार्यालय सुरु करित आहेत. ते स्वत: नगरसेवक बनू पाहत आहेत. नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करित आहेत. ही चुकीची बाब आहे. यापूर्वी महानगरपालिकेत कोणत्याच पालकमंत्र्याने स्वत:चे कार्यालय सुरु केले नव्हते. आमच्याकडे देखील पालकमंत्री पद होते, मात्र अशी गोष्ट आम्ही कधीच केली नाही.

यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. पालिका आयुक्त घाबरलेले आहेत. जे आदेश येतात त्यांचं ते मुकाट्याने पालन करतात. महानगरपालिकेत कायदा कानून शिल्लक राहिलेला नाही, असंही शेख शेवटी म्हणाले.