loni nagpanchami

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

महाराष्ट्र

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार) शाहीर रामदास गुंड सूर्यावाले विरुद्ध शाहीर नासाहेब साळुंखे तुरेवाले यांच्यात हा महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामना रंगला होता.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा कलगीतुरा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी कलगीतुरा शोकिनांनी मोठी गर्दी केली होती. ढोलकी, टाळ, डफ, संबळ व तुणतुण्यांच्या तालावर रंगलेला हा जंगी सामना उपस्थित रसिकांच्या मनात व कानात ज्ञानाची भर टाकून गेला. डफाची थाप ढोलकीचा गगनभेदी आवाज, शाहिरांनी पहाडी आवाजात सादर केलेली कवने उपस्थितांची मने जिंकून गेली. देशभक्ती, सर्वधर्म समभव, मातृ पितृभक्ती या विषयावर झालेली कवने उपस्थितांचे डोळे पाणावून गेली. गण गौळण, सवाल-जबाब, रामायण, महाभारत, पुराण कथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल, अशा विविध विषयावर कलगीवाले व तुरेवाले यांचा सवाल-जवाब चांगलाच रंगला.

कार्यक्रम पाहाण्यासाठी आंबेगाव, शिरूर, खेड, जुन्नर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, पारनेर, संगमनेर तालुक्यातील कलगीतुरा शोकिनांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले, शिवसेना नेते ॲड. अविनाश रहाणे, भाजप तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, विजय पवार, पोलिस उपनिरीक्षक श्री. ताठे यांसह अनेक विविध पक्षांच्या नेत्यांनी भेटी दिल्या.