आता रक्तही महागलं; एका बॅगसाठी मोजावे लागणार इतके रुपये…

महाराष्ट्र

औरंगाबाद: महाराष्ट्रात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नारिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या आरोग्यासाठी गरजेचं रक्त घेण्यासाठी नातेवाईकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्त पिशव्यांच्या किंमतीत वाढ केल्यानंतर आता खाजगी रक्तपेढीतही रक्ताच्या बॉटलच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे पूर्वी 1450 रुपयांना मिळणारी रक्ताची बॉटल खरेदी करताना आता 100 रुपये अधिकचे द्यावे लागणार आहेत. तर सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 1050 रुपयांना मिळणाऱ्या रक्ताच्या बॉटलच्या किंमती 250 रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे सरकारी रक्तपिशव्यांचे नवे दर लागू केल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत रक्त दिलं जाते. परंतु बाहेरच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या रक्ताच्या पिशवीची किंमत 850 वरून 1100 रुपये करण्यात आली आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाने दिली आहे.

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातील इतर रुग्णालयांत एका महिन्याला 7 हजार रक्त पिशव्यांची गरज असते. यासाठी खाजगी आणि शासकीय रक्तपेढ्यांकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करुन रक्तपेढीत रक्त जमा केलं जात. परंतु आता आरोग्य विभागाने रक्तपिशव्यांची किंमत वाढवल्याने त्याचा फटका रुग्ण आणि त्यांचा नातेवाईकांना सहन करावा लागणार आहे.