शिरुर तालुक्यात त्या युवकाने कंपनीची तक्रार करत मागितली खंडणी अन…

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत माहिती मागून नंतर कंपनीच्या एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने मानव विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याच्या विरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील क्रोमवेल इंजिनिअरिंग या कंपनी मध्ये 6 फेब्रुवारी रोजी मानव विकास परिषदेचे लेटरहेड टपालाने पाठवून कंपनीच्या बांधकामाच्या पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण कडून अधिकृत परवानग्या घेतल्या आहेत का याचे कागदपत्रे आम्हाला मिळावी व सदर कागदपत्रे दिले नाही, तर कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा मजकूर होता.

सदर लेटरहेड वर संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर हे 2 नावे होते त्यांनतर 10 फेब्रुवारी रोजी कंपनीचे एच आर मॅनेजर प्रवीण बडदे हे कंपनी समोर असताना निलेश दरेकर याने तेथे येऊन प्रवीण बडदे यांना तुमच्या कंपनीच्या विरोधात माझ्याकडे खूप तक्रारी आलेल्या आहेत. मला तुमच्या कंपनीत ठेका द्या, नाहीतर महिन्याला 15 हजार रुपये द्या, मग मी माघार घेतो, असे म्हणत खंडणी मागून दमदाटी करत एच आर मॅनेजर प्रवीण बडदे यांच्यासह त्यांच्या घरच्यांना मारण्याची धमकी दिली.

घडलेल्या प्रकाराबाबत प्रवीण पंडित बडदे (वय ३८) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. निंबळक ता. अहमदनगर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मानव विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करत निलेश दरेकर याला तातडीने अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस नाईक अतुल पखाले हे करत आहे.

औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही कंपनी अथवा कंत्राटदारांना कोणी धमकावून खंडणी मागत असेल तर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार द्यावी अथवा ९०७७१००१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केला आहे.

मानव विकास परिषद संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम करत आहे. तसेच महिलावरती होणारा अन्यायसाठी पुढे येत प्रशासनासोबत नेहमीच काम करते. एखादा पदाधिकारी जर आमच्या नजरेआड चुकीचं काम करत असेल तर त्याला संस्था जबाबदार नाही कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही ठिकाणी पत्रव्यवहार करुन त्रास देण्यास मानव विकास परीषद सांगत नाही. तसेच कुठल्याही पदाधिकाऱ्यांने चुकीचे काम केल्यास पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करावी आमची कुठलीही तक्रार नाही असे मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.