एकच मुलगी! शरद पवारांना लोक विचारायचे मग तुम्हाला अग्नी कोण देणार?

महाराष्ट्र

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा देशाच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. पवार यांना एकच आपत्य असून त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राष्ट्रीय राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

मात्र अनेकदा खेड्यापाड्यात गेल्यावर पूर्वी शरद पवार यांना एकच मुलगी का? असे प्रश्न विचारण्यात येत होते. यावर पवार यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. सकाळ समूहाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित सिंगल डॉटर फॅमिली कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या पिता-पुत्रींची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारासाठी एका गावात गेलो होतो. तेव्हा एका ज्येष्ठाने म्हटलं की, आम्ही तुम्हाला मत देऊ. पण एकच मुलगी असा आश्चर्यचकित होणारा प्रश्न त्यांनी मला विचारला. मी म्हटलं हो एकच मुलगी. मग त्यांनी विचारलं की बर वाईट झालं तर अग्नि कोण देणार? एकंदरीतच लोकांना अग्निची चिंता होती, असे प्रसंगही घडल्याचं पवार म्हणाले.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पवारांचीच एक जुनी मुलाखत दाखवण्यात आली. त्यामध्ये शरद पवार म्हणतात की माझी मुलगी लगेच राजकारणात पडेल असं नाही. तिला इच्छा पण नाही तशी. मुलाखतीची क्लिप पाहिल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही खळखळून हसले. यावर पवार म्हणाले की, सुप्रिया राजकारणात येईल असं वाटलं नव्हत असं मी म्हणालो. पण एकच मुलगी असली की काही हट्ट सहन करावे लागतात. मुलीबद्दल असेसमेंट कसं चुकू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणावं लागेल.

सेलिब्रेटी बाप-लेकीचं नातं कसं असाव हा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही प्लुटो किंवा नेपच्यूनवरुन आलो नाही. आम्ही नॉर्मल आहोत. माणसं माणसं असतात. लोक त्यांना सेलिब्रिटी बनवतात. त्यामुळे सेलिब्रेटी कन्सेप्टच पटत नाही.

शिक्रापूरचा विजेचा प्रश्न सोडवत आश्वासनाची पूर्तता