मी असा पहिलाच मुख्यमंत्री बघतोय जो लोकांच ऐकून घेतो: बच्चू कडू

राजकीय
अमरावती: गेल्या दोन दिवसांपासून आमरावतीमधलं राजकारण चांगलंच तापलं आहे. ‘गुवाहाटीला गेलेले आमदार’ या रवी राणांच्या टीकेवर बच्चू कडूंनी दिलेलं प्रत्युत्तर देखील स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरलं आहे.
मात्र, एकीकडे रवी राणा यांना लक्ष्य करताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. “महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रुपाने मजबूत माणूस मिळाला आहे”, असं बच्चू कडू येथील एका स्थानिक कार्यक्रमात म्हणाले आहेत. यावेळी रवी राणांच्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतला.
 
“आधी हिरवा-निळा घेऊन फिरायचा, आता…”
 
‘गुवाहाटीला गेलेले आमदार’ हा मुद्दा अमरावतीमध्ये रवी राणा विरुद्ध बच्चू कडू असा सामना सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. आधी रवी राणांनी बच्चू कडूंना गुवाहाटीला गेलेले आमदार म्हणत टोला लगावल्यानंतर त्यावर आता बच्चू कडूंनी “आधी हिरवा-निळा घेऊन फिरायचा, आता भगवा घेऊन फिरतोय” असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
 
नेमकं काय म्हणाले होते रवी राणा?
 
रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात स्टेजवरुन बोलताना आमदार बच्चू कडूंना लक्ष्य केलं होतं. “मी देवेंद्र फडणवीसांसोबत राहणारा सच्चा आमदार आहे. मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या”, असं रवी राणा म्हणाले होते. त्यावरुन आता बच्चू कडूंनी प्रहारच्या एका कार्यक्रमात बोलताना टीकास्त्र सोडलं आहे.
 
“आबे.गुवाहाटीला आम्ही गेलो नसतो, तर तुझं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत आलं असतं का? इकडे गुवाहाटीला जाणारा आमदार म्हणायचं आणि दुसरीकडे मंत्रीपदाच्या रांगेत लागायचं. आम्ही तुझ्यासारखे नालायक आणि नाचणारे नाही आहोत, तर नाचवणारे आहेत हे लक्षात ठेव”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
 
“काही असे बकवास लोक येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर मतं मागितली आणि ५०-६० कोटी घेऊन दुसऱ्यालाच पाठिंबा दिला. आधी निळा आणि हिरवा घेऊन फिरायचा, निवडून आला आणि आता भगवा घेऊन फिरतोय”, असा टोला देखील बच्चू कडूंनी रवी राणा यांचं नाव न घेता लगावला आहे.
 
“एकदा मी रात्री २ वाजता मुख्यमंत्र्यांकडे गेलो तेव्हा…”
 
यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील कौतुक केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या रुपाने अतिशय मजबूत माणूस या महाराष्ट्राला मिळाला आहे. मी एकदा मुख्यमंत्र्यांच्या घरी रात्री २ वाजता गेलो. तेव्हा २००-३०० लोक तिथे हजर होते. मी गेल्या २० वर्षांपासून राज्यात आमदार आहे. पण रात्री २ वाजता २००-३०० लोकांचं ऐकून घेणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहतोय”, असं ते म्हणाले.
 
“कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री, कुणाची युती हे महत्त्वाचं नसून आपल्या मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे”, असं देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.