takali haji society

गावडे घराण्यावर घोडे घराणे पडले भारी…

मुख्य बातम्या राजकीय

टाकळीहाजी ग्रामपंचायतीनंतर सोसायटीवरही दामुआण्णा घोडे गटाची एकहाती सत्ता
सविंदणे (अरुणकुमार मोटे): दामुआण्णा घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत एकहाती ताब्यात घेतल्यानंतर टाकळी हाजी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पदी त्यांच्याच गटाचे चेअरमन बन्सीशेठ बबनराव घोडे यांची व व्हाईस चेअरमनपदी साहेबराव नामदेव लोखंडे यांची निवड झाली आहे.

गेले अनेक दिवसांपासून टाकळी हाजीमध्ये राष्ट्रवादीत गावडे व घोडे असे दोन गट पडले आहेत. अनेकदा डावलल्याने दामुआण्णा घोडे यांनी गावडे घराण्याविरुद्ध बंड पुकारत निवडणुकीत ग्रामपंचायत, सोसायटीवर आपला विजयी झेंडा फडकवून आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांना आपली ताकत दाखवून दखल घेण्यास भाग पाडले आहे.

टाकळी हाजीचे माजी सरपंच दामुआण्णा घोडे यांच्या विचारांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड झाल्याने विजयी उमेदवारांची आणि संचालकांची त्यांनी विजयी मिरवणूक काढून सर्वांचे अभिनंदन केले. या निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी म्हणून दिपक वराळ यांनी काम पाहिले.

यावेळी टाकळी हाजी गावचे माजी सरपंच दामूआण्णा घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, मच्छिंद्र भाकरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष पारभाऊ गावडे, माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे, म्हसेचे सरपंच सौरव पवार, उद्योजक रामभाऊ गायकवाड, राहुल घोडे, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, अनिताताई घोडे,प्रवीण गायकवाड,तसेच संचालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे आणि आभार अर्जुन घोडे यांनी मानले.

राजेंद्र गावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सोसायटीच्या निवडणुकीत चेअरमन तुमचा व्हाईस चेअरमन आमचा असं ठरलं होतं. परंतु, त्यांनी शब्द पाळला नाही. व्हाईस चेअरमन त्यांनी त्यांचाच केला आहे. यावर उत्तर देताना दामुआण्णा घोडे म्हणाले की, ‘ग्रामपंचायतीमध्ये त्यांना मी ताकद दाखवून दिली होती. सोसायटीमध्ये माझ्या गटाचे जास्त बहुमत असल्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन माझ्या गटाचे झाले आहेत. आता पुढील प्रत्येक निवडणुकीत मी त्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहे.’