आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘इतकं’ शिक्षण लागणारच

राजकीय

पुणे: ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान *सातवी पास* असण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून गावाचे कारभार पाहण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केल्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान *सातवी पास* असणे आवश्यक आहे.

सातवी पासचे प्रमाणपत्र द्यावं लागणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात, ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.

दरम्यान, राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी चालली आहे. त्यामुळे ऐन थंडीत गावचे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.