Video: कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात…

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गेले आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पाऊसामुळे कारेगाव येथील मुख्य चौकात गटार लाईन नसल्याने पाणी साठत आहे. पुणे-नगर महामार्गाला मोठया प्रमाणात खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असल्याने रोडच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटवून या ठिकाणी गटार लाईन करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे.

कारेगाव येथील मुख्य चौकात पुणे-नगर रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. अनेक व्यावसायिकांनी या ठिकाणी व्यवसायासाठी गाळे भाड्याने घेतल्याने रस्त्याच्या कडेला वाहने पार्किंग करण्यासाठी मुरुम टाकल्याने दोन्ही बाजूला रोडलगत असणाऱ्या चाऱ्या बुजल्याने पाऊसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन दुचाकी वाहनचालकांना प्रवास करताना पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने रात्रीच्या वेळेस याठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

unique international school
unique international school

अतिक्रमणाचा विळखा सुटणार का…?
पुणे-नगर महामार्गालगत असणाऱ्या सर्वच गावात रस्त्याच्या कडेला स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अतिक्रमण करत मोठ्या प्रमाणात जागा बळकावून त्याठिकाणी व्यावसायिक लोकांना त्या जागा भाड्याने दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केलेल्या असतात. जागा शासनाची मात्र भाडं मात्र हि मंडळी “वसूल” करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ खायला येणारे ग्राहक त्यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेलाच पार्क करतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस शिक्रापूर, रांजणगाव गणपती, कारेगाव, सरदवाडी या ठिकाणी वाहतुक कोंडी हि नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.