शिरुरकरांमुळे लेकासहित तिला मिळाले हक्काचे माहेर

शिरूर तालुका

शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघच्या वतीने निराधार महिलेस माहेर संस्थेत आसरा

शिरुर: गेल्या काही दिवसापासून शिरुर परिसरात फिरणाऱ्या निराधार महिलेस तिच्या तीन वर्षाच्या लहान मुलासह “माहेर” संस्थेत आसरा मिळवून देण्याचे काम शहरातील सामाजिक कार्यकर्त्यानी केले. शिरुरकरांच्या जागृकतेमुळे या निराधार मायलेकांना हक्काचा निवारा तसेच आधार मिळाला असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसु उमटले.

शिरुर शहरात गेल्या काही दिवसापासून अंदाजे ३५ वर्षीय महिला तिच्या ३ वर्षाच्या मुलांसह भटकंती करत होती. शिरुर शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ ती आढळून आली. मागील काही दिवसापासून पुरेसे अन्न तिच्या पोटात न केल्याने ती भुकेने व्याकुळ झाली होती. त्यातच तिचं तीन वर्षाच मुलं वारंवार खेळण्यासाठी पुणे-नगर रस्त्यावर धाव घेत होते. रस्त्यावरील वाहनांपासुन ती आपल्या चिमुकल्याचा बचाव करत होती.

गेले कित्येक दिवस अन्नाचा एकही कण पोटात न गेल्याने त्या “माऊली” च्या अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. तरीही ती “माऊली” मुलाकडे लक्ष ठेवून होती. परंतु तिच्या तोंडून शब्द ही निघत नव्हते. तिची ही अवस्था शिरुर मधील सामाजिक कार्यकर्ते तुषार वेताळ यांनी पाहीली आणि त्यांनी तातडीने याबाबत वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे तसेच शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा संघाच्या अध्यक्षा शशिकला काळे यांच्याशी संपर्क साधला. उषा वाखारे त्याठिकाणी पोहचल्यावर त्या मातेची व लहानग्याची परिस्थिती पाहील्यावर त्यांनी तातडीने त्या लहानग्यास स्वंत :कडे घेतले व तपासणीसाठी डॉक्टरकडे घेवून गेल्या.

त्यांना मुलांसह डॉक्टर घेवून जाण्यासाठी रिक्षा चालक उल्हास साखरे यांनी पुढाकार घेत आपल्या रिक्षातून त्यांना दवाखान्यात पोहोचवले. त्यानंतर शशिकला काळे यांनी संबंधित महिलेस ग्रामीण रुग्णालयात नेत त्याठिकाणी औषधेपचार करत तिला नाष्टा, गोळ्या, औषधे दिली. दरम्यान यासर्व घटने संदर्भात शिरुर पोलिसांना काही जागरुक कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यानंतर शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी ही सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगून या निराधार महिलेला आधार देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

या महिलेला हक्काचा निवारा आणि आधार मिळावा यासाठी शिरुर तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्षा शशिकला काळे, सरचिटणीस राणी कर्डिले आणि त्यांचे सहकारी तसेच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी निराधार महिला व मुलांसाठी काम करणा-या वढू बुद्रुक येथील “माहेर” या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्या निराधार महिलेस संस्थेत वास्तव्य करण्याबाबत होकार दर्शविला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या माय-लेकराना माहेर संस्थेत दाखल केले. शिरुरकरांच्या या मदतीने ही महिला भारावून गेली होती. या माय-लेकरांना निरोप देताना सर्वच कार्यकर्त्याचे डोळे पाणावले होते.