डिंग्रजवाडीत भिल्ल समाजाला मिळाले चाळीस वर्षांनी रेशन कार्ड

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): भिल्ल समाजाचे नागरिक शक्य त्या जागी राहून मोल मजुरी करुन कुटुंब चालवत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनच्या वतीने भिल्ल समाजातील नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलेला असता आता तब्बल 40 वर्षांनी येथील भिल्ल समाजातील नागरिकांना रेशन कार्ड मिळाल्याने भिल्ल समाजाने साखर वाटून आनंद साजरा केला आहे.

डिंग्रजवाडी (ता. शिरुर) येथील गायरान जमिनीमध्ये गेली 40 ते 45 वर्षापासून भिल्ल समाजाचे नागरिक कुटुंबियांसह राहत आहेत. त्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. सदर कुटुंबियांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांची मुले देखील शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशन यांच्या वतीने राजाराम दगडे पाटील यांच्या माध्यमातून या नागरिकांना दारिद्य रेषेखालील रेशन कार्ड देण्याच्या मागणीसाठी एप्रिल २०२२ मध्ये शिरुर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी यांसह शिरुर तहसीलदार येथे देण्यात आलेले असता येथील नागरिकांना रेशन कार्ड देण्यात येतील, असे आश्वासन शिरुर तहसीलदार यांनी दिलेले असता नुकतेच येथील 15 कुटुंबियांना रेशन कार्ड देण्यात आले असून सदर समाजातील नागरिकांना चाळीस वर्षांनी हक्काचे रेशन कार्ड मिळाल्याने नागरिकांनी साखर वाटून आनंद साजरा केला.

यावेळी स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील, अक्षय ठोंबरे, स्वाती शिवले, धनंजय नाणेकर, विठ्ठल तळोले, नितीन भवार, विक्रम ठोंबरे, रेखा भंडारे, मेघा गवारे, स्नेहलता दगडे पाटील, वैशाली ठोंबरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना भिल्ल समाजातील नागरिकांना प्रथमच रेशन कार्ड मिळाल्याने त्यांना झालेला आनंद पाहून समाधान वाटले असून पुढील काळात इतर नागरिकांना देखील रेशन कार्ड सह आदी सुविधा मिळवून देणार असल्याचे स्वराज्य बहुजन सेना व मातृत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी सांगितले.