विठ्ठलवाडीत बिबट्याच्या अफवेने उडाली खळबळ

शिरूर तालुका

वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक ऊस तोड सुरु असताना शेतात बिबट्याची पिल्ले असल्याची अफवा पसरली. मात्र वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जात शेताची पाहणी करत बिबट्या नसल्याचे सांगत शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्ये जनजागृती केली आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भोसेवस्ती नजीक महादेव गवारे यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना शेतात बिबट्याचे पिल्ले दिसल्याचे ऊसतोड कामगारांनी सांगितले. याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कुंभार, प्रशांत गवारे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली यावेळी वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात पाहणी केली असता शेतात कोठेही बिबट्याचे पिल्ले अथवा बिबट्यांच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.

यावेळी वनविभागाचे अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बिबट्यांबाबत जनजागृती करत योग्य खबरदारीच्या सूचना देखील केल्या आहे. मात्र सदर ठीकांनी बिबट्यांच्या अफवेने खळबळ उडाली असून कोठेही बिबट्या अथवा बिबट्याची पिल्ले आढळून आल्यास शेतकऱ्यांनी व नागरिकांनी वनविभागाला माहिती द्यावी असे आवाहन वनरक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.