शिक्रापूर स्थानकात वारकऱ्यांच्या मुलभूत गरजांची वाणवा

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस टी स्थानकात आळंदी येथे कार्तिकी एकादशी साठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्यात येणार असल्याने स्थानकात मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र सदर ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांसह आदी सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आळंदीला जाण्यासाठी अनेक जिल्ह्यातील हजारो वारकरी येत असतात. प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सदर ठिकाणहून माफक दरात एस टी ची व्यवस्था केली जात असते. गेली 2 वर्षे कोरोनाचे सावट असल्याने काही प्रमाणात कमी गर्दी झालेली होती. मात्र या वर्षी सर्व निर्बंध हटलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदी येथे कार्तिकी एकादशीसाठी निघालेले आहेत.

सध्या शिक्रापूर येथे एस टी स्थानकात वारकऱ्यांच्या सोयी साठी गावातील स्थानिक युवकांच्या आम्ही शिक्रापूरकर उपक्रमातून स्वच्छता करत स्थानकाला फलक लावण्यात आलेले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वारकरी येथे हजर होऊ लागलेले आहेत. एकादशीसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे त्यांना विश्रांती ची देखील आवश्यकता असताना शिक्रापूर स्थानकात वारकऱ्यांसाठी योग्य ती व्यवस्था सुद्धा नाही मात्र एस टी स्थानकात वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता गृहाची देखील कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नसल्याने वारकऱ्यांची मोठी दुरवस्था होत महिला वारकऱ्यांची कुचंबणा होत आहे.

याबाबत शिक्रापूर एस टी स्थानकाचे वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ यांच्याशी चर्चा केली असता पाणी व स्वच्छता गृहाच्या सोयी बाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी बोलणे झालेले असून ते सदर व्यवस्था त्यांच्या वतीने करण्यात येईल असे वाहतूक नियंत्रक दिलीप खोडाळ यांनी सांगितले.

स्थानकात शौचालय नसताना ग्रामपंचायत कडून दंडाचा फलक…

शिक्रापूर एस टी स्थानकाची गावातील नागरिकांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली असून सध्या स्थानकात स्वच्छता गृह नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असूनही ग्रामपंचायतच्या वतीने स्थानकात येथे कचरा टाकल्यास अथवा कोठे लघु शंकेस अथवा शौचास केल्यास पाच हजार रुपये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे फलक लावण्यात आले आहे.

शिक्रापूर येथील एस टी स्थानकात वारकऱ्यांसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाण्याच्या व्यवस्था करणार आहे. मात्र शौचालयची व्यवस्था एस टी स्थानकाच्या वतीनेच केली पाहिजे, असे शिक्रापूरचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.