आण्णापूर ते मलठण या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुरवरुन पाबळ, राजगुरुनगर, भिमाशंकर तसेच पारगाव, मंचर, नारायणगाव, आळेफाटा या मोठ्या गावांना जाणारा तसेच अष्टविनायक महार्गाला जोडणारा जवळचा व दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा महामार्ग आहे.

परंतू या रस्त्यावरील आण्णापूर ते मलठण या रस्त्याची खड्डयांमुळे मोठी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांचे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डयांमुळे अनेक अपघात या रस्त्यावर होत आहे.

गेले अनेक दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. तसेच मलठण गावठाणातील रस्त्याचे काम अपुर्ण राहील्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बाजार तळाजवळील रस्त्याच्या कडेला असलेला धोकादायक खड्डा अदयापही बुजवलेला नाही. आण्णापूर, मलठण रस्त्यावरील खड्डे दोन दिवसात न बुजवल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा माजी सरपंच नाना फुलसुंदर, अशोक माशेरे, गणेश जामदार, व मलठण ग्रामस्थांनी दिला आहे..