कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे; नितीन महाजन

शिरूर तालुका

विद्युत वितरण तर्फे विद्युत कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा शिबिराचे आयोजन

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्युत कर्मचारी हे नागरिकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात मात्र विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगून काम करावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथे शिरुर तालुक्यातील विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके व अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे यांच्या पुढाकाराने विद्युत वितरण प्रशिक्षण केंद्र सांगली यांच्या मार्फत सुरक्षा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन बोलत होते.

यावेळी सांगली प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पवार व प्रधान तंत्रज्ञ पाटील साहेब यांनी उपस्थित विद्युत वितरण कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता शिरूर सोमनाथ माने यांच्यासह शिरुर तालुक्यातील दीडशे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयोजित प्रशिक्षण दरम्यान विद्युत वितरणच्या जन मित्रांनी घ्यावयाची काळजी, अपघात होण्याची कारणे, अपघात कसे टाळता येतील याबाबत समुपदेशन करत ग्राहकांना ग्राहकाभिमुख सेवा कशी द्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिर संपन्न होण्यासाठी रांजणगाव गणपती विभागाचे तंत्रज्ञ रामेश्वर ढाकणे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच शिबिराचे शेवटी विजबिल भरा सहकार्य करा, असा नारा देण्यात आला.