शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना सलग चौथ्या वर्षी सदर शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पाबळचे सरपंच मारुती शेळके, पद्ममणी जैन श्वेतांबर तीर्थपेढीचे अध्यक्ष प्रकाश गांधी, माजी सरपंच सोपान जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाबळे, पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष हर्षद गांधी, प्राचार्य अविनाश क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रा. जितेंद्रकुमार थिटे, पोलीस हवालदार गणेश सुतार, मदन मेहता, सुभाष सिंघवी, धरमचंद बाफना, अजित परमार, महेश गोरे, पद्मामणी जैन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर, गाईड मास्टर जिजाबाई थिटे, रेखा चौधरी, हिना तांबोळी यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिस्तप्रिय समाजासाठी शालेय स्तरापासूनच स्काऊट गाईड सारख्या उपक्रमांची गरज असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांनी सांगितले. तर आपत्ती दरम्यान कशा प्रकारच्या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन द्यायच्या याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी सांगितले. या दोन दिवसीय रहिवासी शिबिरामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
स्काऊट मास्टर जिजाबाई थिटे यांनी सदर प्रशिक्षणात राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व गुण, प्रथमोपचार, सुसंस्कृत पिढी तयार होण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना समाजातील वेगवेगळ्या घटकांची माहिती व्हावी यासाठी मूकबधिर व मतिमंद मुलांच्या शाळेला भेट देऊन मुलांना खाऊ वाटप केला. बाजीराव मस्तानी या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन तेथील परिसराची स्वच्छता केली तसेच मुलांनी तंबू उभारुन तात्पुरता निवारा तयार करत तंबू परिसराची सजावट केली.
निसर्गातील आणि समाजातील प्रदूषण कमी व्हायचे असेल आणि चरित्रसंपन्न, श्रमाधिष्ठीत, शिस्तप्रिय, व कौशल्याप्रधान पिढी तयार व्हायची असेल तर स्काऊट गाईडची चळवळ आणखी प्रभावीपणे उभी राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाईड कॅप्टन रेखा चौधरी यांनी तर मुख्याध्यापिका सुरेखा वाईकर यांनी आभार मानले.