महिलांवर होणारे अन्याय सहन करणार नाही; तृप्ती देसाई

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या शिरुर तालुका कार्यालयाचे उद्धाटन भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सरपंच रमेश गडदे, माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, भूमाता ब्रिगेडच्या शिरुर तालुकाध्यक्षा मंगल सासवडे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. पवन सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सुभाष खैरे, शालन राऊत, पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, सिनेकलाकार कैलास ढोकले, उद्योजक अरुण गायकवाड, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद टेमगिरे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सुरेखा इंगळे, सुरेखा कांबळे, कविता जकाते, कल्पना ढोकले, ललिता पोळ, मंगल सोनवणे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू तसेच आरोग्य शिबीर देखील संपन्न झाले. यावेळी बोलताना आता बस झाली दादागिरी व भाईगीरी आता महिलांची ताईगिरी दिसेल. महिलांनी अन्याय झाल्यास घाबरुन न जाता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, महिला एकत्र आल्यास कोणीही काही करु शकत नाही. मात्र त्यासाठी महिलांनी सक्षम बनले पाहिजे, असे सांगत महिलांनी स्त्री सजणाचे स्वागत करुन मुलींना चांगल्या दर्जाची वागणूक द्यावी.

तसेच विधवा महिला पद्धत बंद करुन प्रत्येक महिलेला हळदी कुंकू सह आदी कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेत महिलांमध्ये भेदभाव न करता समान वागणूक देणे गरजेचे असल्याचे देखील तृप्ती देसाई यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा इंगळे यांनी केले तर भूमाता ब्रिगेडच्या शिरुर तालुकाध्यक्षा मंगल सासवडे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरुर तालुक्यात प्रत्येक महिन्याला जनता दरबार

शिरुर तालुक्यातून महिलांच्या अनेक समस्या असून आमच्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये शिरुर तालुक्यातील तक्रारींची संख्या जास्त असून महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक महिन्यात शिरुर तालुक्यात जनता दरबार भरवण्यात येणार असल्याचे देखील तृप्ती देसाई यांनी सांगितले.