तळेगाव ढमढेरेत धावत्या दुचाकीवर बिबट्याला हल्ला

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केल्याने दुचाकीस्वार व्यक्तीची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली असून परिसरात नागरिक भयभीत झाले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील नवनाथ नरके हे पत्नी उर्मिला व मुलगा विराज याच्यासह दुचाकीहून नातेवाईकांकडे गेलेले असताना मंगळवार ११ एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीहून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक नरके यांच्या दुचाकीच्या दिशेने झडप मारल्याची घटना घडली.

यावेळी बिबट्या झडप मारत असल्याचे लक्षात येताच नवनाथ यांनी दुचाकीचा वेग वाढवला त्यामुळे त्यांच्या पत्नी उर्मिला व मुलगा विराज यांच्या पायावर बिबट्याचा पंजा लागल्याने उर्मिला नरके व विराज नरके हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे.

दरम्यान भागात वारंवार बिबट्याचे पशुधनावर हल्ले होत असताना नव्याने घडलेल्या प्रकाराने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे.

याबाबत शिरुर वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदर दुचाकी चालक व्यक्तीची आम्ही भेट घेतली असून त्यांच्या मुलगा व पत्नीच्या पायाला किरकोळ दुखापत झालेले आहे. तसेच परिसरात बिबट्याची पाहणी करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बिबट्याच्या पुढील कार्यवाही बाबत निर्णय घेतला जाईल, असे नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.