शिरुर न्यायालयाच्या निवृत्त अधिकाऱ्यालाच कामगाराचा गंडा

क्राईम शिरूर तालुका

वरुडे येथील खळबळजनक घटना

शिक्रापूर: शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीला शेतात कामाला असलेल्या कामगाराने गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विठ्ठल खामकर या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वरुडे (ता. शिरुर) येथे शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निवृत्त अधिकारी पांडुरंग मुरकुटे यांची शेती असून त्यांनी शेतात कामासाठी विठ्ठल खामकर या व्यक्तीला कुटुंबासह ठेवले होते. विठ्ठल याला राहण्यासाठी खोली देत काही साहित्य देऊन मुरकुटे यांच्या मालकीची एम एच १२ एस ए २२७९ हि दुचाकी देखील दिली होती. ९ ऑगस्ट रोजी गणेगाव खालसा येथील एका व्यक्तीने मुरकुटे यांना फोन करुन सांगितले.

तुमच्या शेतात कामाला असलेल्या विठ्ठलकडे असलेली दुचाकी मी घेतली. त्याला ७ हजार रुपये दिलेले असून ३ हजार रुपये देऊन दुचाकी न्यायची आहे मात्र आत्ता मी शेतात आलेलो असून येथे कोणीही नाही घराला कुलूप आहे, असे सांगितले. त्यामुळे मुरकुटे यांनी शेतातील घरात जात पाहणी केली असता विठ्ठलला दिलेल्या खोलीला कुलूप होते. त्यामुळे त्यांनी कुलूप उघडून पाहणी केली असता घरातील सर्व साहित्य तसेच शेतातील कामासाठी असलेले विद्युत पंप, पाईप यांसह आदी साहित्य घेऊन विठ्ठल खामकर पळून गेला असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत शिरुर न्यायालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले निवृत्त अधिकारी पांडुरंग ज्ञानोबा मुरकुटे रा. लोहगाव पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विठ्ठल खामकर रा. मोटेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.