पाबळच्या ग्रामपंचायत सदस्याला विभागीय आयुक्तांचा दणका

शिरूर तालुका

जिल्हाधिकाऱ्यांनंतर विभागीय आयुक्तांनी रवींद्र चौधरींना ठरवले अपात्र

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यावर शासकीय जागेत अतिक्रमणाचा ठपका ठेवत यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांना अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाबळ (ता. शिरुर) ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केले असून त्याबाबतची माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करताना खोट्या पद्धतीने सादर केल्याबाबतची तक्रार माजी सैनिक छगन खुशाल चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिरुर भूमिअभिलेख यांना सदर ठिकाणी मोजणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असता त्यामध्ये अतिक्रमण निच्छित झाले.

दरम्यान ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांनी तक्रारदार छगन चौधरी यांच्या बाजूने युक्तिवाद केला असता जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत निकाल देत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरुन अपात्र ठरवले होते. त्यानंतर रविंद्र चौधरी यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता पुन्हा तक्रारदार छगन चौधरी यांच्या बाजूने ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांनी युक्तिवाद करत योग्य पुरावे सादर केले असता अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी देखील त्यावर निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र चौधरी यांचे पद अपात्र ठरवले आहे, तर विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे रवींद्र चौधरी यांना चांगलाच दणका बसला असून शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.