मुखईत विद्यार्थ्यांना मिळाला परीक्षेसाठीचा कानमंत्र

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला असून यावेळी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचा कानमंत्र मिळाला आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालया येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर मुकुंद कराडखेडकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. डी. भोसले, संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, कार्याध्यक्ष अशोक पलांडे, संस्थेचे संचालक सदानंद मोरे, मंगेश मोरे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, मुख्याध्यापक सुधिर ढमढेरे, डॉ राजेद्र ढमढेरे यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाची योग्य निवड, शिस्तबद्ध जीवन, यशाला शॉर्टकट नसतो, आरोग्यदायी जीवन आणि वाचनाची जोपासना या बाबी नमूद करत या माध्यमातून सुसंस्कृत माणूस तर घडू शकेलच परंतु तुमचे उज्वल भविष्य नक्कीच घडेल असा आशावाद मुकुंद कराडखेडकर व्यक्त केला. तर निवृत्त जिल्हा न्यायाधीश के. डी. भोसले यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव व्यक्त करत आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित झालो तर यश नक्कीच मिळते ही प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.

दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आलेख मांडत संस्थेला मदत करणाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोगावले यांनी केले, तर प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम अर्जुन शिरसाट यांनी केले आणि रेखा काळे यांनी आभार मानले.