आदिवासी समाजाच्या घरांसाठी काही जागा राखीव

शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर समाजाच्या घरांसाठी २० गुंठे जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंदूर ग्रामपंचायत घेणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी दिली आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथे खेड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गाव असून येथील आदिवासी ठाकर समाज शासकीय सुविधांपासून वंचित असून सदर ठिकाणी सुमारे २५ आदिवासी कुटुंबीय राहत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. या सर्व परिस्थितीचा विचार करुन या आदिवासी कुटुंबांसाठी गावकीची सुमारे २० गुंठे जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत मासिक मीटिंग अथवा ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात येणार असून येथील कुटुंबाना आदिवासी समाजासाठी असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रयत्न करणार आहे.

केंदूर येथे सुमारे २ हजार लोकसंख्या आदिवासी ठाकर समाजाची आहे. येथील ठाकर समाज सुविधांपासून वंचित असून त्यांना दाखले देखील उपलब्ध होत नाहीत. ५ वर्षांपूर्वी रामा गावडे यांच्या कुटुंबाच्या नुकसान भरपाईसाठी या घटनेचा पंचनामा व प्रशासनाने केला होता. परंतु अध्यापही या कुटुंबाला मदत मिळू शकलेली नाही. शासकीय नियमांच्या अडथळ्याचा फटका या आदिवासी ठाकर समाजाला असून येथील समाजाला योग्य सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे देखील सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी सांगितले आहे.