शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने टळले राईनपाडा कृत्य

शिरूर तालुका

पिंपळ्यात संशयित चोर म्हणून मारहाण होणाऱ्या युवकाची सुटका

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सध्या चोर आल्याच्या अफवेला पेव आलेले असताना गावातील नागरिक गावामध्ये येणाऱ्या अनोळखी युवकांची विचारपूस करत असून नुकतेच एका युवकाला संशयित म्हणून बेदम मारहाण होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळताच पोलिसांच्या सतर्कतेने युवकाची मारहाणीतून सुटका झाल्याने राईनपाडा सारखे कृत्य थोडक्यात बचावले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे मागील आठवड्यात बँक फोडण्याचा प्रयत्न झाला तर एका घरामध्ये चोरी झाली तेव्हापासून गावात चोर आल्याची अफवा पसरू लागली अन गावातील युवक गस्त घालत अनोळखी व्यक्तींची विचारपूस देखील करु लागले. मागील आठवड्यात एका युवकाला येथे रात्रीच्या सुमारास बेदम मारहाण झाल्याची घटना घडली तर चार ऑगस्ट रोजी गावामध्ये सायंकाळच्या सुमारास एक अनोळखी युवक आलेला असताना गावातील युवकांनी त्याला चोर म्हणून बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.

याबाबतची माहिती ठाणे अंमलदार पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे यांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, अमोल दांडगे यांनी सदर ठिकाणी जात युवकाची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या घटने सारखे कृत्य थोडक्यात बचावले गेले, दरम्यान पोलिसांनी चौकशी केली असता सध्या कामाच्या शोधात या परिसरात आलेला युवक करंदी येथून सणसवाडी येथे जात होता. मात्र गावातील नागरिकांशी बोलताना तो भयभीत झाल्याने कृत्य झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी सदर युवकावर औषधोपचार करत त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे