विद्यार्थ्यांमधील दृष्टीदोष गंभीर समस्या: अनिल शिंदे

शिरूर तालुका

कान्हूर मेसाईतील विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप

शिक्रापूर: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये मोबाइलचा अतिरेक वापर होत असल्याने लहान वयात निर्माण झालेले दृष्टीदोष ही आजची गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुलांच्या या समस्येकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे असे मत कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी केले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन व कम्युनिटी आयकेअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने कान्हूरच्या विद्यालयातील ७०० विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीदोष निघाला त्यांना डॉ. परीक्षित गोगटे यांच्या माध्यमातून मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पूर्वी एक टक्के विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळत असे मात्र कोरोनाच्या काळात मोबाईलचा वाढता वापर ही सवय बनल्याने आता शाळकरी मुलांमध्ये ५ टक्के दृष्टीदोष दिसून येत आहेत. सदर बाब हि गंभीर समस्या असून या समस्येवर पालक, शिक्षक यांनी मार्ग काढला पाहिजे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कान्हूरच्या विद्याधाम विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करत त्या पैकी तब्बल पंचवीस विद्यार्थ्यांना लेखनिक कविता चौधरी– पुंडे यांच्या हस्ते मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.