sima thite

काठापूर खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सिमा थिटे यांची निवड

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चुरशीच्या ठरलेल्या बेट भागातील काठापूर खुर्द ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंचपदी सिमा थिटे यांची निवड झाली. लोकनियुक्त सरपंचपदासाठी झालेल्या जागेसाठी मुक्ताईदेवी ग्रामविकास पॅनेलकडून सिमा बिपीन थिटे यांनी तर जय हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून कांताबाई यशवंत दिघे यांनी आपले नामनिर्देशन अर्ज सादर केले होते. यामध्ये सात सदस्य कार्यकारिणी असलेल्या या ग्रामपंचायतसाठी एकूण पाच जागेसाठी बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. एकूण ९४.४७ टक्केवारीनुसार यापैकी कोणीही नाही (नोटा) हेड वगळता झालेल्या ७३९ मतदानापैकी सिमा थिटे यांना ३७४ तर कांताबाई दिघे यांना ३६५ मतदान मिळाले आहे.

मुक्ताईदेवी ग्रामविकास पॅनेलकडून सुजाता सोमनाथ होळकर यांची आणि जय हनुमान ग्रामविकास पॅनेलकडून राजश्री अजित कानसकर, शोभा संतोष लोंढे, अशोक बाळासाहेब दाते, सुनिता सत्यवान लोंढे यांची बिनविरोध सदस्यपदाच्या जागांवर वर्णी लागली असून लढत झालेल्या जागांवर प्रभाग क्रमांक एक मधून सदस्यपदाच्या जागेसाठी राजाराम देवराम दाते, मच्छिंद्र बबन होळकर, रंगनाथ जिजाबा होळकर तर प्रभाग क्रमांक तीन मधून विश्वनाथ वसंत जाधव आणि सोमनाथ किसन औटी यांनी आपले नामनिर्देशन सादर केले होते. यावेळी झालेल्या लढतीतून जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे राजाराम देवराम दाते तर मुक्ताईदेवी ग्रामविकास पॅनेलचे विश्वनाथ वसंत जाधव यांनी निवडून येत विजय संपादन केला.

या आधी लोकनियुक्त सरपंचपदी कार्यरत असणारे बिपीन थिटे यांच्या पत्नी सिमा थिटे यांची लोकनियुक्त सरपंचपदी वर्णी लागली असली तरी मात्र बिनविरोध मिळालेल्या जागेसह झालेल्या सरळ लढतीत एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. या आधी केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून काठापूर खुर्द गावचा विकास केला असून पुन्हा मात्र आपल्या पत्नीच्या माध्यमातून ग्रामपंचायतवर सत्ता प्रस्थापित करण्यात यश आल्याने पुढे येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी टाकळी हाजी पंचायत समिती गणातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या थिटे यांच्या बाबतीत आता वरिष्ठ नेते मात्र कोणता निर्णय घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणुकीतील विजयाने गावच्या विकासासाठी जनतेने मला दिलेल्या संधीबद्दल सर्व मतदारांचे आभार व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करते. यापुढील काळात गावातील सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण पारदर्शकपणे काम करणार आहोत.
– सिमा थिटे, नवनिर्वाचित सरपंच

नुकत्याच झालेल्या काठापूर खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने आम्हाला दिलेला कौल मान्य असून या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मी अभिनंदन करते. येणाऱ्या काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि चांगल्या कामांसाठी आम्ही सदैव एकविचाराने सोबत राहणार असून आम्हाला मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मी आभार मानते.
– कांताबाई दिघे

काठापूर, सोने सांगवीमध्ये सरपंदपदी कोणाची लागली वर्णी पाहा…

मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलले, घड्याळाची टिकटिक मात्र बंद