leopard

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

शिरूर तालुका

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे १० जून रोजी रात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक मेंढी ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री ९.४५ वा. ही घटना शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या अंगणात घडली आहे. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी रामभाऊ बाबा येळे (रा. पारोडी, ता. शिरूर) यांच्या राहत्या घरासमोरील मेंढ्यांच्या कळपात आवाज येऊ लागल्याने येळे व त्यांच्या कुटुंबीयांनी कळपाकडे धाव घेतली. यावेळी पाहिले असता बिबट्याने दहा फूट भिंतीवरून प्रवेश करून त्यांच्या कळपातील मेंढीला ठार केल्याचे दिसून आले व दुसऱ्या मेंढीला पंजाने व दाताने चावा घेऊन गंभीर जखमी केले. हा सर्व प्रकार येळे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडा ओरडा करून काठीचा आवाज केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.

पारोडी, सातकरवाडी, येळेवस्ती, इंगळेनगर, दहिवडी निमगाव म्हाळुंगी या परिसरात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे सर्रास दर्शन होत आहे. परिसरात कुत्री, वासरे व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु, सोमवारी रात्री बिबट्याने पारोडी परिसरात अक्षरशः हैदोस घातला. मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला असून, लोकवस्तीमध्ये बिबट्याच्या असलेल्या बिनधास्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच गोठ्यामध्ये घुसून पाळीव जनावरांवर बिबट्या कडून होणाऱ्या या हल्ल्यामुळे अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

संबंधित घटना घडल्या बरोबर भाऊसाहेब येळे व इतर नागरिकांनी वनरक्षक प्रमोद पाटील यांना यासंदर्भात माहिती देण्यासाठी रात्री पंधरा ते वीस वेळा कॉल केला. परंतु, पाटील यांनी फोन उचलला नाही, असे येळे व इतर नागरिकांचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी वनरक्षक प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला .

नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वारंवार करून देखील वनविभागाने काही पिंजरा लावला नाही. त्यामुळे आता पिंजरा लावण्यासाठी वन विभाग कशाची वाट पाहत आहे? असा प्रश्न उपस्थित शेतकऱ्यांनी केला. पारोडी ग्रामस्थ भयभीत झाले असून वन विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी करत आहेत. मानवी वस्तीतील बिनधास्त वावरासह बिबट्याकडून वारंवार होणाऱ्या या हल्ल्यामुळे लोकांसह शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या घडलेल्या प्रकाराबद्दल पारोडी ग्रामपंचायत कर्मचारी सुशांत टेमगिरे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती देत सर्वांना सतर्क राहण्यास सांगितले.

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

कोरेगाव भीमा येथे तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद…