शिक्रापूरः शिक्रापूरमध्ये (ता. शिरूर) दोन चिमुकल्या सायंकाळच्या सुमारास घराची वाट चुकल्यामुळे घाबरल्या होत्या. घरचा रस्ताही त्यांना सांगता येत नव्हता. अंधार पडू लागल्यामुळे त्या कावऱ्या-बावऱ्या होऊन रडू लागल्या होत्या. पण, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे काही तासातच कुटुंबियांचा शोध घेऊन चिमुकल्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलींना पाहून आईच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले.
शिक्रापूरमधील मलठण फाट्यावरील सिद्धीविनायक परिसरात ही घटना घडली आहे. साधारण दोन-तीन वर्षांच्या दोन लहान मुली एकमेकींचा हात धरून घर शोधत होत्या. पण, कुटुबियांसोबत चारच दिवसांपूर्वी परिसरात राहायला आल्यामुळे त्यांना आपले घर नेमके कोठे आहे, हे सांगता येत नव्हते. शिवाय, वयाने लहान असल्यामुळे बोलताही येत नव्हते. घरचा पत्ता विचारल्यानंतर दिसेल तिकडे फक्त बोट दाखवायच्या. दोघींना घेऊन दीड किलोमीटरचा परिसर शोधला पण घर सापडत नव्हते.
सुवर्णा धायबर आणि राणी आठवले या सजग महिलांनी वाट चुकलेल्या चिमुकल्यांना मायेने जवळ घेतले. बिस्किट खायला देत त्यांना आधार दिला. शिवाय, त्यांचे फोटो काढून परिसरातील सिद्धीविनायक ग्रुपवर व्हायरल केले. दुसरीकडे, चिमुकल्या मुलींचे आई-वडीलही त्यांचा शोध घेत होते. ग्रुपवर माहिती आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी चिमुकल्यांच्या मावशीला सांगितले. मावशी सुद्धा त्यांचा शोधच घेत होती. पण, संबंधित महिला नेमकी नातेवाईक कशावरून असावी, अशीही शंका नागरिकांच्या मनात उपस्थित झाली. यामुळे शरद धायबर, रामराव भोत आणि श्री. आठवले हे चिमुकल्या मुलींची मावशीसोबत त्यांच्या घरी गेले. आई-वडिलांना पाहून मुलींनी आईकडे झेप घेतली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. चिमुलींच्या वडिलांच्या मोबाईलमधील फोटो पाहून त्यांच्याच मुली असल्याची खात्री झाली आणि दोन्ही चिमुकल्यांना त्यांच्या स्वाधीन केले. कुटुंबियांनी सु्द्धा शरद धायबर, रामराव भोत आणि श्री. आठवले यांचे आभार मानले.
दरम्यान, शिक्रापूरमधील सजग नागरिकांमुळे दोन-तीन तासांपासून वाट चुकलेल्या दोन्ही चिमुकल्या पालकांकडे सुखरूप पोहचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी श्री. धायबर, रामराव भोत आणि श्री. आठवले कुटुंबाचे अभिनंदन केले.
‘लहान मुली असल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते किंवा घरचा पत्ता सांगता येत नव्हता. दोन्ही मुली परिसरातीलच असतील, असे आम्हाला वाटत होते. प्रथम परिसरात त्यांच्या पालकांचा शोध घ्यावा आणि नाही सापडले तर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन जावे, असा विचार होता. पण, सुदैवाने व्हॉट्सऍपमुळे आई-वडिलांचा शोध लागला आणि दोन्ही मुली सुखरूप आई-वडिलांच्या स्वाधीन केल्या. वाट चुकलेल्या मुलांची अथवा त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल, हे आम्ही समजू शकत होतो. त्यामुळे काळजी वाटत होती. प्रत्येक कुटुंबियांनी लहान मुलांची काळजी घ्यायला हवी,’ असे शरद धायबर यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी
शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…
शिरूर मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांच्याकडून अधिकृतरित्याच बॅनर पोस्टर होर्डिंग लावण्याचे आवाहन
शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…
शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…