शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण व पुणे नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी नेहमी चर्चेचा विषय बनत असताना आज सकाळच्या पहाटेपासून येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली असताना वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असताना अनेक नागरिकांनी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर आज पहाटे पासूनच अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. रस्त्यावर कोठे अपघात झाला असावा असा अंदाज नागरिकांनी व वाहन चालकांनी लावला मात्र काही वेळाने वाहतूक कोंडी वाढतच गेली.

दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, काही वेळाने तर चक्क वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागून पूर्णपणे रस्ताच बंद झाला. शिक्रापूर नंतर जातेगाव फाटा तसेच पिंपळे जगताप चौफुला पर्यंत वाहतूक जाऊन पोहचली वाहतूक कोंडी वाढतच होती. मात्र काही केल्या वाहतूक कोंडी कमी होईना काही वाहन चालकांनी तर अक्षरशः रस्त्यावर वाहने उभी करुन विश्रांती घेण्यास सुरवात केली.

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील चौफुला येथे करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सामाजिक कार्यकर्ते राघू नप्ते, स्वप्नील शेळके, महेश साबळे, रवींद्र नप्ते यांसह आदींनी रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. दिवसभर वाहतूककोंडी होत असताना दुपारनंतर काही प्रमाणात वाहतूक कोंडी सुरळीत होऊ लागली, तर अनेक वाहन चालकांसह नागरिकांना या वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ आली.

नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे; वंदना साबळे

सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे, मात्र रस्त्यावर वाहतूककोंडी झाल्या नंतर स्थानिक नागरिकांनी वाहतूककोंडी सोडवण्यास परिश्रम घेतल्यास वाहतूक कोंडीला आळा बसेल त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पोलीस पाटील वंदना साबळे यांनी सांगितले.

डीवायएसपिंची तातडीची बैठक…

शिक्रापूर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्या नंतर शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची चर्चा केली.