टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकुन देण्याची वेळ

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): सध्या टोम्याटोला प्रतिकिलो 5 रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन टोम्याटो फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोम्याटोला केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असुन कोणत्याचं तरकारी पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे.

टोम्याटोला एका एकरात नांगरणी,बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच माल परिपक्व होईपर्यंत अंदाजे एक लाख रुपये खर्च येतो. परंतु सतत असणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पडणारा पाऊस यामुळे यंदा टोम्याटोला प्रति दहा किलोला 50 रुपये बाजारभाव मिळत असुन दिवसेंदिवस मजुरी वाढत असुन रांजणगाव MIDC मुळे शेतात काम करण्यास मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

टोम्याटोला एकरी एक लाख रुपये खर्च केला असुन सध्या त्याला प्रति किलो 5 रुपये बाजारभाव मिळत असल्याने मोठा आर्थिक तोटा झाला आहे. यावर्षी पाऊस भरपुर झाल्याने कोणत्याही तरकारी पिकाला जास्त बाजारभाव मिळाला नाही. कांद्याला बाजार नसल्याने अजुनही कांदा वावरातचं पडून आहे. त्यात अवकाळी पाऊसामुळे कांद्याचेही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मनोज ओव्हाळ

शेतकरी, शिंदोडी

यंदा पाऊस मुबलक झाला तसेच अवकाळी पाऊसही झाला त्यामुळे मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी टोम्याटोची लागवड केली. परंतु सध्याचा बाजारभाव पाहता टोम्याटो बाजारात विक्रीला नेण्यापेक्षा तो फेकुन देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. टोम्याटोचा खर्चसुद्धा वसुल होत नसल्याने तसेच अवकाळी पाऊसामुळे आमच्या वावरात टोम्याटोला अक्षरशः लाल चिखल झाला आहे.

प्रकाश शिंदे

शेतकरी, शिंदोडी