शिक्रापुरात बेकायदेशीर सावकारी प्रकरणी एकावर गुन्हा

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे व्यवसायिकांना व्याजाने पैसे देऊन वेळेवर पैसे परत न केल्याने व्यवसायिकांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजहर सय्यद या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यवसायिक राजेंद्र करंजे यांच्या साक्षी हॉटेलमध्ये अजहर सय्यद हा इसम आला होता त्याने मी व्याजाने पैसे देतो आणि पन्नास दिवसाच्या मुदतीत दररोज काही रक्कम ठरवून परत घेतो असे सांगत पैशाची आवश्यकता आहे का असे सांगितले.

दरम्यान करंजे यांना पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी काही पैसे घेतले आणि त्याची परतफेड देखील सय्यद यांना दररोज वेळोवेळी केली. त्यानंतर पुन्हा करंजे यांनी काही पैसे घेतले मात्र व्यवसाय मंदीत असल्याने काही पैसे दिल्यानंतर पुढील पैसे वेळत देऊ न शकल्याने अजहर सय्यद याने करंजे यांच्या हॉटेल मध्ये येत पैशाची मागणी केली असता सध्या धंदा कमी आहे लवकरच पैसे देतो असे करंजे यांनी म्हटले असता सय्यद याने करंजे यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत राजेंद्र भालचंद्र करंजे (वय ५०) रा. पाबळ चौक शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अजहर सय्यद रा. नाना पेठ पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे हे करत आहे.