Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या कोठडीतून पळालेला आरोपी अखेर गजाआड

क्राईम

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अटकेत असलेला शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमधे ठेवलेला असताना (दि २२) जून रोजी पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फे बंटी बिरु सोनटक्के (वय २२) रा. वारजे माळवाडी, पुणे हा आरोपी पळून गेला होता. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस आधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी ४ पोलिसांना जबाबदार धरत निलंबित केले होते. तसेच आरोपीची शिरुर पोलिस स्टेशनच्या व गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत शोधाशोध सुरू होती. दरम्यान आरोपीने शिरुरहून निघाल्यानंतर प्रवासात विविध ठिकाणे बदलली होती. त्यामुळे तपासकामात वारंवार अडथळा निर्माण होत होता.

unique international school
unique international school

शिरुर पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे आणि त्यांचे कर्मचारी, पोलिस हवालदार नाथासाहेब जगताप, सहाय्यक फौजदार संतोष पवार, पोलिस हवालदार विजय जंगम, सहाय्यक फौजदार नातू यांनी जंग जंग पछाडत त्या आरोपीला कळंब, वालचंदनगर ता. इंदापूर येथे लपून बसलेला असताना त्याने चोरी करुन आणलेल्या फोर्ड इको स्पोर्ट या चारचाकी गाडीसह त्याला पकडण्यात यश मिळवले आहे. हा आरोपी कोठडीतून पळून गेल्याने शिरूर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

शिरुर पोलिस स्टेशनमधील नाथासाहेब जगताप यांनी सहकार्यांच्या मदतीने तब्बल १० दिवस माहीती काढत त्याने चोरलेल्या गाडीच्या मागावर राहत फुटेज काढत अथक प्रयत्न करुन हा आरोपी पकडला आहे. या गुन्हयामध्ये निलंबित केलेले सहाय्यक फौजदार संतोष पवार, संजय जाधव, विजय जंगम, यांनी नाथासाहेब जगताप यांना मोलाची मदत केली. त्यामुळे शिरुर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता निलंबित केलेल्या पोलिसांबद्दल पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे