रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साहिल मुढाई हा रांजणगाव गणपती, शेळकेवस्ती येथे राहण्यास असुन त्याचे मुळ गाव किसाननगर, ता. सावली, जि. चंद्रपुर असुन सागर शेलार आणि प्रविण गजाळे या दोघांनी साहिल याच्याकडुन रांजणगाव MIDC त सिक्युरिटीची नोकरी लावतो म्हणुन दोन हजार रुपये घेतले तसेच त्याच्या नातेवाईक असलेल्या मुलीचा आठ हजार रुपये पगार थकवला होता. अशी दोघांची मिळुन एकुण दहा हजार रुपयांची फसवणूक केली होती. साहिलने वरील दोघांना वारंवार त्या पैशांची मागणी केली होती. त्यावेळेस त्या दोघांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेत या दोघां विरोधात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिसांनी यातील प्रविण गजाळे याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता. त्याला गुरुवार (दि. 20) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असुन सागर शेलार हा फरार झाला आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल जगताप पुढील तपास करत आहेत. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेकजण प्लेसमेंटच्या नावाखाली युवकांची फसवणूक करत असुन असा गैरप्रकार झाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी केले आहे.