Video: कारेगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; पुणे-नगर महामार्ग पाण्यात…

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 18) रोजी सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कारेगाव तसेच फलके मळा येथे पाऊसाचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहून आल्याने पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुक कोंडी झाली. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे ट्राफिक पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक युवकांनी रात्री उशिरापर्यंत वाहत्या पाण्यात जीव धोक्यात घालत रस्त्यावर उभे राहून वाहतुक सुरळीत करण्यास मदत केली. त्यामुळे वाहनचालकांना मोठी मदत झाली.

मंगळवारी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे कार्यक्रमानिमित्त बाभुळसर खुर्द येथे येणार असल्याने ट्राफिक पोलिस दुपारपासूनच कारेगाव येथील मुख्य चौकात वाहतुकीच नियोजन करत होते. सायंकाळी 5 वाजता कारेगावसह परिसरात मोठया प्रमाणात ढगफुटी सदृश पाऊस झाला. सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाल्याने कारेगाव, फलकेमळा या ठिकाणी पाऊसच पाणी थेट पुणे-नगर महामार्गावर आल्याने रस्ता पाण्याखाली गेला. त्यात कारेगाव येथील मुख्य चौकात रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना खड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने वाहने बंद पडली. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

त्यामुळे पुणे-नगर रस्त्यावर पूर्वेला कारेगाव ते सरदवाडी आणि पश्चिमेला कारेगाव ते राजमुद्रा चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे वाहतुक विभागाचे सहायक फौजदार मारुती पासलकर, पोलिस अंमलदार सुरज वळेकर, होमगार्ड विकास नाणेकर, सोमनाथ गोरडे, ट्राफिक वार्डन राहुल कोळी, विशाल तरवटे, वैभव तरटे, विजय मंडलकर, निहार साबळे, कुमार जाधव, प्रदीप लेंडे तसेच पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पार्टीचे कार्याध्यक्ष बापूसाहेब नवले, अतुल नवले, मंगेश नवले, संकेत दूंडे, बाळा गवारे, तेजस गवारे, सोनू गवारे, सोनु नवले, नागेश बोऱ्हाडे, शुभम दूंडे, विकास नवले, प्रविण वाळुंज आणि कारेगाव येथील टेंबी नाका मिञ मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ट्राफिक पोलिसांना वाहतुक सुरळीत करण्यास पहाटे पाच वाजेपर्यंत मदत केली.

नैसर्गिक ओढे बुजविल्याने पाऊसाचे पाणी थेट रस्त्यावर…

पुणे-नगर महामार्गाचे काही वर्षांपुर्वी रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यामुळे बिल्डरलॉबीने मोठया प्रमाणात प्लॉटिंग करत बिल्डिंगी उभ्या केल्या. परंतु हे करत असताना अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे नाले अक्षरशः गाडून टाकले. तसेच ओढ्याची रुंदी कमी झाली. यावर्षी गेल्या अनेकवर्षी झाला नव्हता एवढा मुसळधार पाऊस झाल्याने शिरुर तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरले. तर पुणे-नगर माहामार्ग पाण्याखाली गेला. कारेगाव मध्ये मुख्य चौकात रस्त्याच्या लगतच सत्ताधारी स्थानिक राजकीय पुढाऱ्यानीच अतिक्रमण केल्याने तसेच गटार लाईनच बुजविल्याने रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे दरवर्षी कारेगावच्या मुख्य चौकात पाऊसाळ्यात पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली जात असतो. या स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या अतिक्रमाणावर सार्वजनिक बांधकाम खात हातोडा चालविणार का…? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.