केंदुरमध्ये घराचा दरवाजा तोडून पावणे दोन लाखांची चोरी

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील एका बंद घराच्या मुख्य दरवाजा सह सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी येथे राहणारे किशोर राहणे हे त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले असताना त्यांनी केंदुर गावातील घराच्या दरवाजासह सेफ्टी दरवाजाला लॉक लावून ठेवलेले होते. (दि. १८) डिसेंबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास राहणे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे शेजारील नागरिकांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती किशोर रहाणे यांना दिली असता राहणे यांनी तातडीने घरी येत पाहणी केली असता घराच्या दोन्ही दरवाजांचे लॉक तुटलेले व घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने तसेच घरातील भिंतीवरील टीव्ही चोरीला गेल्याचे दिसून आले.

याबाबत किशोर धोंडीबा राहणे (वय ४९) रा पाराषर हाउसिंग सोसायटी चंदननगर पुणे मुळ रा. सुक्रेवाडी केंदुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहे.