शिक्रापूरातून अठ्ठेचाळीस लाखांचा ऐवज चोरणारे चोवीस तासात जेरबंद

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गोडाऊन बाहेर उभा केलेला अल्युनियमचा माल भरलेला ट्रक व ट्रक मधील मुद्देमाल असा सुमारे 48 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्यांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले असून सुधील गंगाधर भारती, रोहित सुधीर भारती व गजानन रामभाऊ जाधव असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका गोडाऊनमध्ये पिंपरी चिंचवड मधील सिद्धिविनायक रोडलाईन्स या ऑफिस मधून एम एच ०६ के ३९८२ या ट्रक मध्ये त्रेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांचा अल्युनियमचा माल घेऊन ट्रक चालक २९ सप्टेंबर रोजी आलेला होता. सदर ट्रक चालकाने ट्रक गोडाऊन बाहेर उभा करुन जेवण करण्यासाठी गेला काही वेळाने जेवण करुन आला असता ट्रक जागेवर नसल्याचे दिसून आले.

त्यानंतर त्याने सिद्धिविनायक रोडलाईन्सचे व्यवस्थापक मनोहर मारणे यांना फोन करुन माहिती दिली. सर्वांनी परिसरात ट्रकचा शोध घेतला मात्र ट्रक मिळून आला नाही. त्यामुळे 43 लाख 50 हजार रुपयांचा अल्युनियमचा माल व 5 लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे 48 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्याने मनोहर काशिनाथ मारणे (वय ५8) रा. कासारवाडी ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले.

सदर गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीला गेलेला ट्रक शिक्रापूर चाकण रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागे लावला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक अमोल दांडगे, विकास पाटील, रोहिदास पारखे यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ट्रक व ट्रक मध्ये तिघेजण मिळून आले यावेळी पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेत मुद्देमालाच्या ट्रक जप्त केला आहे.

सुधील गंगाधर भारती (वय ४६), रोहित सुधीर भारती (वय २3), दोघे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. टाकळसिंग ता. आष्टी जि. बीड व गजानन रामभाऊ जाधव रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. विरेगाव ता. जालना जि. जालना या तिघांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल दांडगे हे करत आहे.