रांजणगाव MIDC येथील फियाट कंपनीत चेंबरमध्ये पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू 

क्राईम

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीत सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणाऱ्या चेंबरचे चोकअप काढत असताना १५ फूट खोल चेंबर मध्ये पडल्याने दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन शुक्रवार (दि 4) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हे दोन्ही कामगार चेंबरमध्ये पडले मात्र चेंबरचे झाकण बारीक असल्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीच्या साहाय्याने हा चेंबर फोडून या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यास एक तास लागला. मच्छिंद्र दादाभाऊ काळे (वय ४२), रा. शिंदोडी, (ता. शिरुर) जि. पुणे) व सुभाष सुखदेव उघडे (वय ३०), रा. शिरुर अशी मृत कामगारांची नावे आहेत.

रांजणगाव एमआयडीसीतील फियाट कंपनीतील हाऊस किपिंगचे कंत्राट दिलेल्या खाजगी कंपनीत काम करत होते होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनूसार कंपनीतील सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणारे चेंबर चोकअप झाल्याने हे चोकअप काढण्यासाठी सक्शन मशिन असलेले वाहन कंपनीत आले होते. या सक्शन मशिनचा पाईप चेंबरमधे सोडून तेथील मैलापाणी व सांडपाणी खेचण्याचा प्रयत्न चालू होता. सुभाष उघडे यांनी पाईप धरला होता. परंतू पाईपचे जास्त व्हायब्रेशन होऊ लागल्याने चेंबर मध्ये डोकावून पाहात असतानाच तोल जाऊन ते चेंबर मध्ये पडले. हे पाहून मच्छिंद काळे हे त्यांना वाचविण्यासाठी शिडी लावून चेंबरमध्ये उतरले. परंतू, त्यांना वाचवत असतानाच त्यांच्याही डोक्याला मार लागल्याने ते देखील मैलापाणी असलेल्या चेंबरमध्ये पडले.

अनेक कामगारांसमोर हा प्रकार घडला. परंतू चेंबरचे तोंड छोटे असल्याने आत पडलेल्या कामगारांना मदतीसाठी त्यांना काही करता आले नाही. हे काम करणारा कंत्राटदार बाबूराव गंगाधर कलंदर याने मदतीसाठी फियाट कंपनीचे प्रतिनिधी पंकज सिंग यांना संपर्क साधल्यावर तातडीने दोन जेसीबीच्या साहाय्याने हा चेंबर खोदून काळे व उघडे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीसाठी हे मृतदेह शिरूरच्या शवविच्छेदन गृहात हलविण्यात आल्यानंतर तेथे दोन्ही कामगारांच्या नातेवाईकांनी गर्दी केली. यावेळी आलेल्या कंपनी व कंत्राटदार प्रतिनिधींसमोर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मैलाटाक्या साफ करायचे काम या कामगारांचे नसताना त्यांना त्या कामाला कसे लावले, असा सवाल नातेवाईकांनी केला.

तसेच हे दोन कामगार मैलाटाकीत पडले असल्याचे समजल्यानंतर कंपनी प्रशासनाने धीमेपणाने हालचाली केल्या, मदतीसाठी अद्ययावत यंत्रणा वापरली नाही, या दोन्ही कामगारांना सुरक्षिततेची कुठलीही साधने पुरविण्यात आली नव्हती, अशा तक्रारीही नातेवाईकांनी केल्या. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्यानंतर तणावाचे वातावरण पसरले.

दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे व पोलिस नाईक ब्रह्मानंद पोवार आदींनी मृत कामगारांच्या नातेवाईक तरूणांची समजूत घातली. बामसेफचे राजेंद्र करंदीकर, शिंदोडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज, शिवसेनेचे योगेश ओव्हाळ, वाडेगव्हाणचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, फुले – आंबेडकर उत्सव समितीचे संघटक रामभाऊ झेंडे हे यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेबाबत सखोल चौकशी करुन दोषी असणारांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांनी सांगितले.