ranjangaon midc police

रांजणगाव एमआयडीसीत फिरणाऱ्या निराधार महिलेस मिळाला हक्काचा निवारा…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरात निराधार मनोरुग्ण अवस्थेत फिरणाऱ्या महिलेस रांजणगाव एमआयडीसी पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हक्काचा निवारा मिळाला आहे.

याबाबत सविस्तर असे की, रांजणगाव एमआयडीसी येथील फियाट कंपनी येथील गेट नंबर १ परिसरात एक महिला गेल्या काही दिवसांपासून निराधार व बेवारस स्थितीत आढळून आली होती. अचानक वाढलेली थंडी तसेच सदरील महिला काही दिवसांपासून उपाशी असल्याचे ही कामगारांना दिसून आले. यावेळी सदरील बाब ही रोहित चौधरी यांनी शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका राणी चोरे यांना सांगितली. यावेळी चोरे यांनी देखील तत्काळ सदर ठिकाणी धाव घेत मनोरुग्ण महिलेची अवस्था पाहिली. त्यांनी ही बाब रांजणगाव पोलिसांना सांगितल्यानंतर कॉन्स्टेबल शुभम मुत्याल व रोहिणी हजारे, सामाजिक कार्यकर्त्या मीना गवारे यांच्या साहाय्याने सदर महिलेस पोलिस स्टेशन येथे हजर करत रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणी व उपचार केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार गणेश सातव यांच्या सहकार्यातून मांजरी खुर्द येथील माहेर संस्थेच्या वास्तल्यधाम प्रकल्पात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत दाखल केले.

सामाजिक कार्यकर्त्या राणी चोरे यांनी सांगितले की, महिलेची अवस्था पाहिली असता पुढील होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिलेला योग्य ठिकाणी दाखल करणे गरजेचे होते. कंपनीतील रोहित चौधरी सारख्या तरुण व्यक्तींनी समाजात माणुसकी दाखवून दिल्यामुळे आज तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचवता आले. यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, वैभव मोरे, रोहिणी हजारे, मीना गवारे, गणेश सातव, गणेश जामदार माहेर संस्थेचे कार्यकर्ते आदींचे मोठे सहकार्य लाभले. पोलिसांच्या सहकार्यामुळे निराधार मनोरुग्ण महिलेस हक्काचा निवारा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.