शिरुर तालुक्यात शेतकरी महिलेने तहसिलदारांकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी मागितली शासकीय मदत 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा आदेश देऊनही त्या भागातील मंडळ अधिकारी यांना वेळ नसल्याने एका शेतकरी महिलेने शेतात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने थेट तहसिलदार यांनाच अर्ज करुन हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान देण्याची विनंती केली आहे.

शिरुर तहसिल कार्यालय गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असुन वाळूच्या पकडलेल्या गाड्या पैसे घेऊन तळेगाव ढमढेरे येथील गोडाऊन मधुन सोडुन पुन्हा त्याच गाड्या चोरी केल्याचा आरोप असो किंवा अंधश्रद्धेतुन तहसिल कार्यालयात बोकडाचा नैवेद्य दाखविन्याचा प्रकार असो अशा विचित्र घटनांमुळे संपुर्ण पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात बदनाम झालेल्या तहसिलदार कार्यालयात सर्वसामान्य लोकांना एखाद्या कामासाठी वर्षांनुवर्षे हेलपाटे मारावे लागतात. परंतु तरीही प्रशासनातील अधिकारी त्यांची कामे वेळेवर करत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

शिरुर तालुक्यातील निमोणे येथील शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने दि 5 डिसेंबर 2022 रोजी 1966 च्या कलम 143 अन्वये शिरुर तहसिल कार्यालयात रस्ता मागणीचा अर्ज केला होता. त्या अर्जावर तत्कालीन तहसीलदार यांनी एका तारखेची सुनावणी घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु आदेश प्राप्त झाल्यापासून मंडळ अधिकारी यांना शेतकरी लताबाई हिंगे यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या कार्यालामध्ये स्थळ पाहणी करण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेकवेळा हेलपाटे मारुनही ते महाशय त्यांना भेटले नाहीत.

त्यानंतर काही दिवसांनी लताबाई हिंगे आणि संबंधित मंडळ अधिकारी यांची भेट झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी “लवकर स्थळ पाहणी करतो”, “मला सध्या वेळ नाही”, “मी नवीन बदली होऊन आलेलो आहे” अशी कारणे देत गेल्या अनेक दिवसांपासुन स्थळ पाहणी करण्यास टाळाटाळ केली. हिंगे यांच्या शेतामध्ये पिक काढणीला आलेले असतानाही त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे शेतामध्ये पिकवलेला माल मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जायचा कसा…? असा गहण प्रश्न लताबाई हिंगे यांना पडला असुन शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे शेतमाल बाहेर काढण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदी करणे अत्यंत अवश्यक झालेले आहे. त्यामुळे हिंगे यांनी शिरुरच्या तहसीलदारांकडे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान किंवा मदत मिळावी असा अर्ज केला आहे.