कान्हूर मेसाईत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई ता. शिरुर येथे अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबलेल्या असताना आता पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ सुरु झाला असून नुकतेच बिबट्याने एका मेंढीचा फडशा पाडला असल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील खर्डे वस्ती येथे तान्हाजी खर्डे यांच्या शेतात धुलाशंकर चोरमले व काळूराम चोरमले हे मेंढपाळ बसलेले असून रात्रीच्या सुमारास मेंढ्या ओरडण्याचा आणि कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने चोरमले जागे झाले असता एक बिबट्या मेंढी ओढत घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या मेंढी जागेवर सोडून पळून गेला. मात्र मेंढी ठार झाली.

याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक ऋषिकेश लाड व वनमंजूर हनुमंत कारकुड यांच्या माध्यमातून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. मात्र बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने सदर ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी पोलीस पाटील कमलेश शिर्के यांनी केली, तर याबाबत बोलताना सदर ठिकाणी पाहणी करुन पुढील कार्यवाही केली जाईल असे वनरक्षक ऋषिकेश लाड यांनी सांगितले.