शासकीय नोकर मालक की नोकर…? सर्व सामान्य लोकांशी करतात अरेरावी

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालय या सरकारी कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असुन या कार्यालयात वर्षानुवर्षे कामासाठी खेटे घालणाऱ्या नागरिकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडुन अरेरावी केली जात असुन हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की या कार्यालयाचे मालक आहेत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कोण लगाम घालणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिरुर तहसील कार्यालयात वेगवेगळे विभाग असुन प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांची मनमानी चालु असुन या अधिकाऱ्यांना “चिरीमिरी” दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शिरुर तालुक्यातील अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने कारवाई करुनही या ठिकाणी “जैसे थे” परिस्थिती आहे. तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या “एजंटा” कडुन तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना “मलिदा” चारल्याशिवाय कामाची फाईल पुढे सरकत नसल्याचे चित्र सगळीकडे दिसत असुन त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसत असल्याचे दिसत आहे.

तारीख पे तारीखमुळे जनता त्रस्त…

शिरुर तालुक्यात सर्वात जास्त पेडींग फाईल या भूमि अभिलेख आणि महसूल विभागात असुन अनेक लोकांच्या फायली वर्षानुवर्षे या कार्यालयात धुळखात पडून आहेत. त्यामुळे संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्याबाबत प्रश्न विचारल्यास ते सर्वसामान्य लोकांना उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावी करतात. त्यामुळे हे सरकारी अधिकारी जनतेचे नोकर आहेत की या कार्यालयाचे मालक आहेत हेच समजत नसल्याचे सर्वसामान्य लोकांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.