कारेगाव मध्ये रात्रीच्या वेळेस जाळला जातोय धोकादायक कचरा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतने कचरा टाकण्यासाठी गट क्रं 39/3 हा भाडे तत्वावर घेतला असुन या ठिकाणी गावातील सर्व कचरा एकत्र केला जातो. परंतु रात्रीच्या वेळेस हा कचरा पेटविण्यात येत असुन त्याच्या धुर व दुर्गंधीमुळे येथील नवलेमळा आणि फलकेमळा येथील स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात या धुराचा त्रास होत असुन त्यांना मोठया प्रमाणात श्वासनाचे आजार होत आहेत.

याबाबत रोहित रामदास नवले, सदानंद तानाजी नवले, रविंद्र पोपट नवले आणि अक्षय आण्णासाहेब नवले यांनी कारेगाव ग्रामपंचायत, रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन, रांजणगाव MIDC उप अभियंता कार्यालय, शिरुर तहसीलदार, पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना 5 डिसेंबर रोजी लेखी निवेदन दिले असुन त्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कारेगाव येथील ग्रामसेवक किसन बिबे यांना वारंवार फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.