कासारीतील कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा घरात डल्ला

क्राईम शिरूर तालुका

दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला तब्बल चार लाखांचा ऐवज

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील कुटुंब शेजारील मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कासारी (ता. शिरुर) अमित सातपुते व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती घराला कुलूप लावून शेजारी राहणाऱ्या कुंडलिक नवले यांच्या मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेले असताना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अमित यांची आई लग्नाहून घरी आली असता तिला घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले तसेच कपाटातील सर्व कपडे अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील 2 ठिकाणी ठेवलेले दोन्ही कपाटे उघडे तसेच सर्व साहित्य फरशीवर पडल्याचे दिसल्याने त्यांनी कपाटांची पाहणी केली असता दोन्ही कपाटातील 2 लाख रुपये व 4 तोळे सोन्यासह काही चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार शिवाजी चितारे, अमोल दांडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार योगेश नागरगोजे यांसह आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

याबाबत अमित तात्याबा सातपुते (वय ३५) रा. रासकर मळा कासारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे व रोहिदास पारखे हे करत आहे.