शिरुर तालुक्यात प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये मुलींच्या समस्या मांडण्यासाठी तक्रारपेटी बसवा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी…  

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात अनेक माध्यमिक विदयालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी अनेक मुली तालुक्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्या मुलींना शाळेत किंवा महाविद्यालयात त्या मुलींना अनेक अडचणी असतात. तसेच त्यांची छेडछाडही केली जाते किंवा त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. त्यामुळे शिरुर तालुक्यातील प्रत्येक शाळेत आणि कॉलेजमध्ये मुलींसाठी तक्रारपेटी बसवावी अशी मागणी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी निवेदनाद्वारे केली असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना निवेदन देण्यात आले आहे.

शिरुर तालुक्यातील शाळेत आणि कॉलेजमध्ये सध्या मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असुन बऱ्याच वेळा समाजात आपली बदनामी होईल या भीतीने अनेकवेळा मुली या गोष्टी कोणालाच सांगत नाहीत. त्यामुळे या मुलींच्या समस्या कोणालाच कळत नाही. त्यामुळे शिरुर तालुक्यातील सर्व 8 वी ते 10 वी पर्यंतच्या शाळा तसेच 11 ते 15 वी पर्यंतच्या कॉलेज मध्ये मुलींसाठी तक्रारपेट्या बसविल्यास मुली आपल्या समस्या लिहून त्या तक्रार पेटीत टाकतील. आठ किंवा पंधरा दिवसातून ती तक्रारपेटी संबंधित पोलीस स्टेशनच्या महिला पोलिस अधिकारी किंवा महिला पोलिस कर्मचारी आणि संबंधित पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता कमिटीच्या सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात याव्यात. त्यामुळे मुलींच्या अनेक समस्या पुढे येतील असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, शोभना पाचंगे, पत्रकार किरण पिंगळे, डॉ वैशाली साखरे, सुवर्णा सोनवणे, राणी शिंदे, दिपाली आंबरे, प्रियंका बंडगर आदी महिला उपस्थित होत्या.