नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष चौकाकडे जाणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करणार का…?

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): “शिरूरच्या बाजारपेठेत अतिक्रमण करत बांधकाम सुरू,नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” असे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत शिरुर नगरपालिकेकडे सुरेश खांडरे यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत शैलेश किसनराव खांडरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” कडे लेखी खुलासा केला असुन सुभाष चौकातील त्या चौकामधील सर्वच बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या परवानगीनुसार नसून जुन्या जोत्याप्रमाणे म्हणजेच नगर परिषदेच्या डिमांड रजिस्टरला असलेल्या नोंदीप्रमाणे असल्याचे सांगितले आहे.

तसेच सदर ठिकाणी दर्शनी भागात मुख्य रस्ता असून मागील बाजूस सरकारी बोळ आहे. त्यामुळे त्याठिकाणी अतिक्रमण करण्यास जागाच शिल्लक नाही. अशी वस्तुस्थिती असताना मी त्या ठिकाणी सिटी सर्व्हे नंबर 327 मध्ये करत असलेल्या बांधकामाची परवानगी घेतलेली असून मी त्याप्रमाणे पूर्णपणे माझ्या मालकीच्या व ताबे वाहिवाटीत असलेल्या जागेत बांधकाम करत असून 1 इंच देखील कोणाच्याही जागेत अतिक्रमण करून बांधकाम केलेले नसल्याचे शैलेश खांडरे यांनी सांगितले आहे. तसेच ज्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे ते सुरेश खांडरे माझे भाऊबंध असुन त्यांच्या शेजारी माझे बांधकाम झाल्यास त्यांच्या व्यवसायास प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये म्हणून शिरुर नगरपालिकेत त्यांनी खोटे अर्ज देऊन मला त्रास देण्याचे काम सुरु केल्याचे सांगितले.

तसेच मी सुद्धा सदर तक्रारदार सुरेश खांडरे यांची सिटी सर्वे नंबर 326 ही जागा सुद्धा माझ्या जागे एवढीच लांबीची असून त्याचे बांधकाम अतिक्रमण मध्ये असून ते पाडण्याचा अर्ज दिलेला आहे. तसेच शिरुरच्या बस स्टॅण्ड पासून सुभाष चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या सर्व जागा मालकांनी मुख्य रस्त्याच्या बाजूंनी खूप मोठया प्रमाणात गॅलरी बाहेर काढून रस्त्यावर येणारा नैसर्गिक हवा आणि प्रकाश बंद केलेला असल्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही का…? आणि आले असेल तर त्यांनी आतापर्यंत कोणती कायदेशीर कारवाई केली याचा खुलासा होणे आवश्यक आहे.

तसेच शिरुर शहरातील गेल्या 10 वर्षात झालेल्या नवीन बांधकामाचा सर्व्हे करुन ते बांधकाम परवानगी नुसार आहे किंवा नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच सदर बांधकामे नियमानुसार केलेले नसून देखील त्यांना कंपलिशन सर्टिफिकेट दिलेले असेल तर संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून संबंधित बांधकामे पाडून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शैलेश खांडरे यांनी दिलेल्या लेखी खुलाशात केलेली आहे. याबाबत सुरेश खांडरे यांना विचारले असता, सदर चाललेले बांधकाम हे अनधिकृत आहे ते सिटीसर्वेच्या मोजमापानुसार आणि प्रशासनाच्या नियमानुसार व्हावं असे सांगितले.