…तरच आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारेल

मुख्य बातम्या

मांडवगण फराटा (संपत कारकूड): प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण फराटा येथील दवाखाना नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून येथे दिवसाला १०० ते २०० च्या दरम्यान रुग्ण प्राथमिक उपचार घेत असून नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता येथे रोज एकाला तरी तातडीने – अतितातडीने रुग्णवाहिकेची गरज लागते. परंतु 2 रुग्णवाहिका आणि 1 चालक अशी स्थिती असल्यामुळे येथील रुग्णांची हेळसांड होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे.

आरोग्य केंद्रामध्ये उत्तम स्थितीतील 2 रुग्णवाहिका असतानाही 108 ला कॉल करावा लागतो, ही खेदजनक बाब असून रुग्णवाहिका असतानाही पेशंटची सोय होण्याऐवजी गैरसोय होत असून पेशन्टला तातडीने दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्यास उशीर होत असून रुग्णाच्या जीविताशी खेळ खेळणाऱ्या या प्रकारामध्ये प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

दोन रुग्णवाहिका उभ्या असूनही त्याचा उपयोग त्या-त्या वेळेत रुग्णांना होऊ शकत नाही, तर रुग्णवाहिका फक्त शोभेच्या वस्तू आहेत काय? असा संतप्त सवाल परिसरातील सामाजिक कार्यकर्ते औदुंबर फटाले यांनी केला आहे. जर का अर्जंट पेशन्ट असेल आणि सरकारी दोन रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही १०८ ला फोन करण्याचे प्रसंग रुग्णांवर आलेले आहेत.

१०८ ला फोन केल्यावर त्यांचीही उलटी उत्तरे ऐकावी लागतात. रुग्णवाहिका येण्यास 2 ते 3 तासांचा वेळ लगतो. मग सरकारी दवाखान्यातील 2 रुग्णवाहिका काय कामाच्या. दोन रुग्णवाहिका आणि एक चालक अशी स्थिती का आहे? चालक रजेवर असताना अर्जंट सेवा कशी केली जाते? रुग्णवाहिकीच्या दैनंदिन प्रवासाची किलोमीटर प्रमाणे चौकशी ठेवली जाते का? असेल तर ती प्रशासन चेक करते का? असे एक नव्हे अनके प्रश्न येथे उपस्थित होत असून सध्या रुग्णाला वेळेत दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांना रुग्णापेक्षाही जास्त वेदना होतात.

याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पेशंटच्या नातेवाईक यांनी केला आहे. या सर्व प्रकारांची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन यामध्ये सुधारणा झाली तरच या आरोग्य केंद्राचे आरोग्य सुधारेल आणि पेशन्टला वेळेत उपचार होतील.