करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांची आर्थिक फसवणुक केल्याबाबत जिल्हा सत्र न्यायायलाने आरोपी संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या दोन्ही बाप-लेकीचा दि २२ जुलै २०२५ रोजी जामीन फेटाळला आहे. त्यानंतर आठ दिवस उलटुनही शिरुर पोलिसांनी या बाप-लेकीला अटक केले नसल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

माजी सैनिक पत्नी असलेल्या रेश्मा राहुल वाळके या डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन त्यांचा राजीनामा घेतल्याप्रकरणी सचिन संभाजी वाळके, प्रियांका संभाजी वाळके आणि संभाजी वाळके तसेच CS आणि CA यांच्यावर रेश्मा वाळके यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे दि २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती.

करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांनी आर्थिक फसवणुक केल्याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात २७ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर अखेर १९ मार्च २०२५ रोजी यातील मुख्य सुत्रधार सचिन संभाजी वाळके याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्याला १० दिवस पोलिस कोठडी आणि २ दिवस न्यायायलीय कोठडी देण्यात आली. त्यानंतर शिरुर न्यायालयाने त्याचा जामीन मंजुर केला.

त्यानंतर संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन मिळावा यासाठी वकिलांमार्फत युक्तीवाद केला. परंतु न्यायालयाने फिर्यादी आणि आरोपी या दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर २२ जुलै २०२५ रोजी संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या बाप-लेकीचा जामीन फेटाळला आहे. परंतु जामीन फेटाळल्यानंतर आठ दिवस उलटूनही अजुन या बाप-लेकीला अटक झालेली नाही. त्यामुळे शिरुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

करडे येथील माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात शिरुर पोलिस स्टेशन मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुरवातीपासुनच हस्तक्षेप केला. तसेच तो अधिकारी आणि एक कर्मचारी आरोपी सोबत राजरोसपणे फिरत होते. त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निश्चित झाल्यानंतर पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी त्या अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला निलंबित केले. परंतु त्या नंतरही परत एक वरिष्ठ पोलिस अधिकारी यात हस्तक्षेप करुन अजुनही आरोपीना वाचवत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे पोलिस दलातील या झारीतील शुक्राचार्यावर पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल काय कारवाई करणार हे येणारा काळचं ठरवेल.

करडे कंपनी फसवणुक प्रकरणात शिरुर न्यायालयाने आरोपीच्या अटकेबाबत काही सुचना केलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास करुन पुढील अटकेची कारवाई करण्यात येईल.

संदेश केंजळे (पोलिस निरीक्षक)

शिरुर पोलिस स्टेशन 

(क्रमश:) 

 

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई;परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

शिरूर वनविभागातील वनपाल महिलेची दोन वर्षाची वेतनवाढ कायम स्वरूपी रद्द