Shirur Police Station

शिरूर तालुक्यात भरदिवसा महिलेची सोन्याची पोत हिसकावली…

क्राईम मुख्य बातम्या

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवून तिच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून नेली. मंगळवारी (ता. ९) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

द्वारकाबाई शंकर भोर (वय ५०, रा. गणेशनगर, इनामवस्ती, कवठे येमाई, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. द्वारकाबाई भोर या कवठे येमाई येथून देवदर्शन करून पायी घरी जात होत्या. बेंदाड ओढ्याजवळ आल्या असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. एकाने त्यांचा हात धरला, तर दुसऱ्याने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली. या वेळी त्यांच्या हातातील पिशवी खाली पडली, ती देखील चोरट्यांनी लांबवली. त्यात महिला बचतगटाची १० पुस्तके, १० महिलांचे आधारकार्ड होते.

कवठे येमाई सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम इचके हे दुचाकीवरून तेथून जात होते. त्यांना लुटमारीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी दुचाकीवरून उतरून चोरट्यांच्या दिशेने दगड फेकले. तसेच चोरट्यांच्या दिशेने धावताना दगडास ठेचकळल्याने ते खाली पडले. यामध्ये त्यांच्या हाताला मार लागला आहे. या दरम्यान चोरट्यांनी कोयत्यांचा धाक दाखवत तेथून दुचाकीवरून पळ काढला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ज्ञानसुख फटांगडे, काशिनाथ सरोदे, दत्तात्रय भोर घटनास्थळी पोहचले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला; पण चोरटे पसार झाले. पत्रकार सुभाष शेटे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, दीपक पवार, पोलिस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर लोकसभेतील मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द; कारण…

शिरूर तालुक्यात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले अन्…

शिरुर तालुक्यातील दुचाकी चोर निघाला यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी

रांजणगाव MIDC परिसरात कोयत्याचा धाक दाखवुन मोबाईल चोरी करणा-या तीन सराईत आरोपींना अटक

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…