pdcc-election

शिरूर तालुक्यात जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी तिघेजण इच्छुक…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) आगामी संचालक मंडळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या २०२६ -२०३१ या कालावधीसाठी सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव कार्यक्रम पार पडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

शिरूर तालुक्याच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार अशोक पवार हे प्रमुख इच्छुक असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी संचालक स्व. अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्नील गायकवाड आणि शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एका जागेसाठी तीन इच्छुकांमध्ये राजकीय समीकरणे जुळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिरूर तालुक्यातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सर्वाधिक ठराव स्वप्नील गायकवाड यांच्या बाजूने झाले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशोक पवार यांच्या गटाकडून आपल्याकडे संस्थात्मक पातळीवर मजबूत पाठबळ असल्याचा दावा केला जात आहे. तर स्वप्नील गायकवाड यांच्या समर्थकांकडूनही तालुक्यातील विविध भागांतील सहकारी संस्थांचे ठराव आपल्या विचारांच्या गटाकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील ४२ गावच्या सहकारी संस्थांचे सर्वाधिक ठराव गायकवाड यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात आहे. राजेंद्र जासूद यांनीही आपली स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर तालुका दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागलेला असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतांचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. तालुक्यातील काही गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात. त्यामुळे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भूमिका या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत अशोक पवार यांनी शिरूरमधून विजय मिळवला होता. मात्र यावेळी परिस्थिती बदललेली असून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील राजकीय समीकरणांची पुनरावृत्ती होते की नवे समीकरण आकाराला येते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

शिरूरच्या पूर्व भागातील राजकारणात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा यापूर्वीपासून चर्चेत आहे. कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र या नाराजीचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदानावर नेमका किती परिणाम होईल, हे निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, ठराव मिळविण्यावरून शिरूर तालुक्यातील काही गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता तालुक्यातील आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे.

गायकवाड विरुद्ध जासूद : एकत्र येणार की स्वतंत्र लढणार?
स्वप्नील गायकवाड आणि राजेंद्र जासूद हे दोघेही अजित पवार गटाशी संबंधित राजकीय वर्तुळात चर्चेत असल्याने त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. दोघांपैकी एकाने माघार घेऊन एकत्रितपणे उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला किंवा दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तर शिरूरच्या निवडणुकीचे गणित त्यानुसार बदलू शकते. सध्या मात्र दोघांची स्वतंत्र मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र आहे.

स्वप्नील गायकवाड यांच्याकडे स्व. अरुणआबा गायकवाड यांचा सहकारातील राजकीय वारसा आहे. तर राजेंद्र जासूद यांना पंचायत समितीतील राजकीय अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्काचा आधार आहे. अशोक पवार यांच्याकडे जिल्हा बँकेतील विद्यमान संचालक म्हणून अनुभव आणि सहकार क्षेत्रातील दीर्घ राजकीय वाटचालीचा संदर्भ आहे.

शिरूरच्या या जागेसाठी उमेदवारी अंतिम कोणाला मिळते, आणि इच्छुकांमध्ये कोणते राजकीय समीकरण आकाराला येते, यावर आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेत्यांची भूमिका आणि सहकारी संस्थांचे प्रतिनिधी कोणाच्या बाजूने उभे राहतात, हे या निवडणुकीतील महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत