प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिला हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

महाराष्ट्र

रत्नागिरी: पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, रत्नागिरी) असे या महिला पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.

ती नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशुध्द पडली. तिला अधिक उपचारांसाठी दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी 3.18 वा. सुमारास तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

सांची सावंत हिचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची ही तिसर्‍या वेळी गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतु शुक्रवारी सकाळी तिला आकडी येऊन ती बेशूध्द पडली. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितल्यावर पतीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाने तिचे मुलही दगावले असून सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी 4.30 वा.सुमारास उत्तरीय तपासणीसाठी सांचीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, सांचीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकातील पोलिस कर्मचारी तसेच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.