राज्यात पहिल्यांदाच ITI मधील विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे धडे, शासनाचा अभिनव पुढाकार

महाराष्ट्र

मुलूंड आयटीआय येथे पार पडली डक्सलेजीस संस्थेची कार्यशाळा

मुंबई: चहाच्या कपाला रबर लावता येईल, खाली प्लेट लावता येईल, कपाचा पृष्ठभाग मोठा करता येईल, विद्यार्थी उत्साहात एकेक पर्याय सुचवित होते आणि अचानक ही संशोधक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कुठून आली या प्रश्नासह शिक्षकवृंदाच्या चेहऱ्यावरही समाधानाचे भाव विलसत होते तर विद्यार्थ्यांना आपल्यातील संशोधकवृत्तीचा पहिल्यांदाच परिचय होत होता. गरम चहा कपात असताना हाताला चटका लागू नये आणि कप हातातून पडू नये म्हणून काय उपाय करता येईल, हा प्रश्न प्रशिक्षक आणि “डक्सलेजीस” संस्थेचे प्रमुख दिव्येंदु वर्मा यांनी विचारला आणि विद्यार्थ्यांनी एकाहून एक उत्तम पर्याय सांगत शिक्षकवृंदाना चकित केले.

निमित्त होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,मुलुंड येथे आयोजित “बौद्धिक संपदा” कार्यशाळेचे! राज्यात पहिल्यांदाच अशी कार्यशाळा राज्य शासनाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी आयटीआयमधील विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती विकसित व्हावी आणि भविष्यात पेटंट मिळवू शकेल, असे संशोधन त्यांनी करावे,या हेतूने राज्यभरातील आयटीआय विद्यार्थ्यांसाठी “डक्सलेजीस” बौद्धिक संपदा क्षेत्रातील विधी संस्थेच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरविले. त्यानुसार मुलुंड आयटीआयमध्ये पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

“दिल्लीत सातवीत शिकणाऱ्या एका मुलाने पेटंट मिळवू शकेल असे संशोधन केले. तुम्ही तर तंत्र कौशल्य प्राप्त केलेले आहे.तुम्ही नक्कीच नवे शोध लावू शकता. शोध ही केवळ उच्चशिक्षित लोकांची मक्तेदारी नाही,” असे वर्मा म्हणाले. कार्यालयात लिपिक असलेल्या जोहान वॅलेर यांनी एका 10 सेंटीमीटरच्या तारेला 4 ठिकाणी वाकवले आणि तयार झाली कागदात काहीही न टोचता त्यांना एकत्र ठेवणारी क्लिप आणि या संशोधनाचे त्यांना पेटंटही मिळाले. असे संशोधन तुम्ही करू शकत नाही का ? केवळ आईन्स्टाईन एडिसनच शोध लावू शकतात असा विचार मनातून काढून टाका, असे वर्मा यांनी यावेळी सांगितले.

पेपर क्लिप,चहाची किटली, चहाचा कप आणि प्लास्टिक बाटल अश्या जीवनातील नेहमीच्या उपयोगाच्या वस्तूमध्ये शोध लावून पेटंट कसे मिळविण्यात आली याची अनेक उदाहरणे देत त्यांनी साध्यासोप्या पद्धतीने हा विषय उलगडून दाखविला. चहा गरम असताना चटका लागून चहाच्या कप हातातून पडू नये यासाठी कपच्या रचनेत काय बदल करता येईल या त्यांच्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधकवृत्तीचा परिचय देत विविध पर्याय सुचविले तेव्हा आयटीआयचा विद्यार्थीही संशोधक होऊन पेटंट मिळवू शकतो या वर्मा यांच्या वक्तव्याची उपस्थित सर्वाना प्रचिती आली.

“जगभरातील शोध आणि संशोधन हे विविध प्रकारच्या गरजातून निर्माण झालेले आहे. आयटीआय मधील प्रत्येक विद्यार्थी हा आवश्यक असलेल्या गरजांच्या निर्मिती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तसेच विविध क्षेत्रातील उपकरणे वापरताना येणाऱ्या अडचणीचे ज्ञान असल्याने त्यावर मात करण्यासाठीचे उपाय आयटीआयचे विद्यार्थी शोधू शकतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याजवळील दैनंदिन वापराच्या वस्तूकडे पाहताना संशोधक वृत्तीने व त्यात काही नवीन शोध वा सुधार करता येईल का या दृष्टीने पहावे,” असे आवाहन डक्सलेजीस या संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ संशोधक अड. दिव्येंदू वर्मा यांनी केले. यावेळी मुलुंड आयटीआयचे प्राचार्य एस. एस. गोरे, उपप्राचार्य संदीप परदेशी,डक्सलेजीसच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख प्रीती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुलुंड आयटीआयचे प्राचार्य एस. एस. गोरे यांनी पहिल्यांदाच झालेल्या बौद्धिक संपत्तीच्या या कार्यशाळेबद्दल डक्सलेजीस संस्थेचे आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळेतून निश्चितच मोठे ज्ञान आणि नवी दृष्टी मिळाली असल्याचे ते म्हणाले. मुळात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी पेटंट हा विषय महत्त्वाचा आहे. या कार्यशाळेमुळे छोट्या मोठ्या तांत्रिक प्रश्नांवर उपाय शोधण्यात आयटीआयचे विद्यार्थी भविष्यात योगदान देतील, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला.